दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्री शिंदेंचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 01:56 PM2023-07-07T13:56:06+5:302023-07-07T13:56:39+5:30

दिव्यांग चिमुकल्याची जिद्द पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारावल्याचे दिसले.

 Chief Minister Eknath Shinde has contributed Rs 5 lakh for the treatment of Ganesh Mali, a handicap boy of class III in Nandurbar district  | दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्री शिंदेंचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत

दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्री शिंदेंचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत

googlenewsNext

मुंबई : दिव्यांग चिमुकल्याची जिद्द पाहून मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे भारावल्याचे दिसले. हात नसलेला हा चिमुकला चक्क पायाने अक्षरं रेखाटत आहे. त्याच्या या जिद्दीला सलाम करत शिंदेंनी त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. 'अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला' या कवी कुसुमाग्रजांच्या ओळींद्वारे एकनाथ शिंदेंनी या चिमुकल्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या व दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या या लहानग्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्र्यांनी ५ लाख रूपयांची मदत केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लहानग्याचे फोटो शेअर करत म्हटले, "कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी मला आठवल्या कारण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गणेश माळी या चिमुकल्याने काल वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली."

उपचारासाठी ५ लाखांची मदत 
नंदुरबार जिल्ह्यातील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गणेश माळी या चिमुकल्याने गुरूवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. याचे काही फोटो मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. हा लहानगा दोन्ही हातांनी दिव्यांग असून त्याला शिक्षणाप्रती आवड आणि जिद्द असल्याचे पाहायला मिळाले. 

तसेच हा चिमुकला दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. त्याला भेटून त्याची शिक्षणाप्रती आवड आणि जिद्द बघायला मिळाली. पायाच्या बोटात पेन धरून तो जिद्दीने लिखाण करतो. तसेच जेवण, कपडे परिधान हेही काम गणेश पायांनी करतो अशी माहिती गणेशचे वडील विलास माळी यांनी मला दिली. यावेळी गणेशच्या या जिद्दीचे कौतुक करून त्याला त्याच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला, असे एकनाथ शिंदेनी आणखी सांगितले. 

Web Title:  Chief Minister Eknath Shinde has contributed Rs 5 lakh for the treatment of Ganesh Mali, a handicap boy of class III in Nandurbar district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.