Eknath Shinde: 'खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे'; एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 01:18 PM2022-09-22T13:18:54+5:302022-09-22T13:21:30+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नवी दिल्ली/मुंबई- माझ्यावर कंत्राटदार मुख्यमंत्री असल्याचा आरोप केला जात आहे. होय, मी बेरोजगारांना रोजगार देण्याचे कंत्राट घेतले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कंत्राट घेतले आहे. वृद्धांना मदत करण्याचे कंत्राट घेतले आहे. यासाठी मला कुणी कंत्राटदार म्हणत असतील तर ते माझ्यासाठी भूषणावह आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. शिवसेनेच्या देशातील १३ राज्यांमधील राज्यप्रमुखांची सभा बुधवारी दिल्लीत आयोजित केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड शब्दात उत्तरे दिली.
...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाप पळवणाऱ्यांची औलाद आता महाराष्ट्रात फिरतेय, असा घणाघात केला होता. याबाबत शिंदे म्हणाले, आम्हाला अभिमान आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. पण तुम्ही मग बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येत आहे. शिवसैनिकांवर विश्वास नाही, म्हणून प्रतिज्ञापत्र घेतले जात आहेत. अडीच वर्षांनी गटप्रमुखांना अच्छे दिन आले, असा टोलाही टोला एकनाथ शिदेंनी लगावला.
BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई
विरोधकांकडून वारंवार '५० खोके एकदम ओके' अशा घोषणा देत शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला जात आहे. यावर देखील एकनाथ शिंदे यांनी विधान केलं आहे. खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी सांगायला सुरूवात केली, तर तुम्ही कुठे राहणार आहे. पब्लिक है सब जानती है, असे म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर हल्ला चढविला.
हिंमत असेल, तर एक महिन्यात निवडणूक घ्या- उद्धव ठाकरे
हिंमत असेल, तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या अन् आणखीच हिंमत असेल, तर त्या सोबतच विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जमीन दाखविण्याची भाषा करीत आहात, आम्ही तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी दिले. शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शिंदे मिंधे झाल्याची टीका-
वेदांतबाबत धादांत खोटे बोलत आहात, धारावीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गेले. कोणाची बाजू घेऊन बोलत आहात? होय महाराजा, म्हणत दिल्लीचे मिंधे झाला आहात, असा हल्लाबोल ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला. सगळे मिळून शिवसेनेला संपवायला निघाले आहेत, सोबत मुन्नाभाई (राज ठाकरे) घेतला आहे. शिवसैनिकांमध्येच रक्तपात घडवायचा अन् स्वत: साफ राहायचे, असे भाजपचे चालले आहे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.