'राज ठाकरेंनी आम्हाला घरी बोलावलं तेव्हा...'; युतीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
By मुकेश चव्हाण | Published: October 25, 2022 04:04 PM2022-10-25T16:04:54+5:302022-10-25T16:05:16+5:30
भाजपा, शिंदे गट आणि मनसेच्या युतीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी युतीवर भाष्य केलं होतं.
हे सरकार आम्ही दिलेल्या सूचना ऐकतं. त्यानुसार काम करतं. अशी कामे होत असताना जर जवळीक होत आहे. आम्ही काही सत्तेत नाही. सत्तेत बसायच्या आधी आम्ही भाजपला मतदान केलं होतं. आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी युतीसाठी होकार दिल्यास आम्हीही त्यासाठी तयार असू, असं विधानही राजू पाटील यांनी यावेळी केलं.
भाजप-शिंदे गट-मनसेची महायुती होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले, “प्रस्ताव आला...”
राजू पाटलांच्या या विधानावर आज पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. यावर दिवाळीत मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंनी घरी बोलावलं होते. त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त सण-उत्सव यावर चर्चा झाली, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच यावर्षी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होत असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
राजू पाटलांच्या या विधानावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. राजू पाटील यांनी महायुतीचे संकेत दिले असले तरी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत मी बोलणार नाही. परंतु एकत्र येऊन काम करणे ही काळजी गरज आहे. आम्हाला मुंबईकरांचे जीवन सुखी करायचे आहे, असं दीपक केसरकर म्हटलं आहे. तसेच परस्परांना सहकार्य करण्याचे राजू पाटील यांच्या वक्तव्याचे मी आभार आहे, असंही दीपक केसरकरांनी म्हटलं आहे.
दिवाळी गडचिरोलीच्या जवानांसोबत
राज्याच्या सीमेवर असलेले पोलीस जवान आणि सी-69 जवान आपला जीव धोक्यात टाकून आणि कुटुंबास दूर राहून आपला कर्तव्य बजावत असतात. पालकमंत्री असताना गडचिरोलीच्या जवानांसोबत मी दरवर्षी दिवाळी साजरा करत होतो. आता मुख्यमंत्री असतानाही मी त्यांच्यात जाणार आहे. अति दुर्गाम भागात आपले जवान नक्षलवाद्यांशी लढून आपले रक्षण करतात. त्यांच्या जीवनात दिवाळी प्रकाश घेऊन यायला पाहिजे. त्यांनादेखील सण उत्सवाचा आनंद घेता आला पाहिजे. याच उद्देशाने मी त्यांच्याकडे भामरागडला जातोय आणि दिवाळी साजरी करतोय, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.