तोच शो, तीच कॅसेट अन् तोच थयथयाट, फक्त जागा बदलली; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
By मुकेश चव्हाण | Published: March 5, 2023 10:55 PM2023-03-05T22:55:27+5:302023-03-05T23:06:34+5:30
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या मोठ्या निर्णयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ज्यांना शक्य ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तोच शो होता, तीच कॅसेट होती आणि तोच थयथयाट होता, फक्त जागा बदलली होती. बाकी काही नवीन मुद्दे नव्हते, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेबांचे व्यापक विचार होते. वडील-वडील करुन त्यांना कोणी छोटं करु नये. खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही. आम्ही त्यांच्या खासगी प्रॉपर्टीवर दावा केले नाहीय. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. सभेसाठी मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईसह विविध ठिकाणांहून कार्यकर्ते घेऊन गेले होते, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनी रात्री मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी संवाद https://t.co/IMftKXGLc1
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 5, 2023
दरम्यान, 'नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं. ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलं नाही, तेदेखील आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवत आहेत. हे गद्दार तिकडे मुख्यमंत्री झाले अन् महाराष्ट्रातून उद्योगधंदे राज्याबाहेर गेले. हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. एक काळी टोपीवाला होता, गेला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाईंचा अपमान केला. दिल्लीसमोर झुकण्याचे विचार बाळासाहेबांचे नाहीत,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा | शिवगर्जना | खेड, रत्नागिरी - LIVE
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 5, 2023
🚩आता जिंकेपर्यंत लढायचं 🚩#UddhavThackeray#निष्ठावंतशिवसैनिक#रत्नागिरी#MAHARASHTRA
[SUNDAY-0️⃣5️⃣-0️⃣3️⃣-2️⃣0️⃣2️⃣3️⃣] https://t.co/JVEtKLRCSo
१९ मार्चला एकनाथ शिंदेंची खेडमध्ये सभा-
उद्धव ठाकरे आज ज्या ठिकाणी सभा घेताय, त्याच ठिकाणी १९ मार्च रोजी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांची सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील अनेक आमदार आणि नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी यावेळी दिली. तसेच आमच्या या सभेतून व्याज्यासह त्यांना उत्तर देण्यात येईल, असा इशारा रामदास कदम यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरे खेडमध्ये येतायत म्हणून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाले आहे. यामध्ये खेडमधील २ टक्के देखील स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश नाही. रामदास कमदचा या लोकांनी किती दसका घेतलाय, हे यामधून दिसून येतंय. बाहेरची लोक आणून इथे राजकारण होत नाही, असा टोलाही रामदास कदम यांनी यावेळी केला.