मुंबई- आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला. पण आता थांबण्याची त्याची तयारी नाही. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
अजित पवारविदर्भातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? इथे फिल्डवर उतरूनच बघावं लागतं असा टोला देखील अजित पवारांनी शिंदे सरकारला लगावला होता. अजित पवारांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही उंटावरुन शेळ्या हाकत नाही. अजित पवार दौऱ्यावर थोडे उशिरा पोहचले. पूर ओसरल्यावर अजित पवार दौऱ्यावर गेले. आम्ही त्यांच्या आधी दौरा केला होता, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी दिलं. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही अजित पवार म्हणाले.
अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती- अजित पवार
मराठवाडा विदर्भ महाराष्ट्राच्या इतर भागातील अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती असून शेतकरी व्याकूळ झालेला आहे. याबाबत आम्ही काहीतरी सांगितलं, विचारणा केली तुम्ही मंत्रिमंडळात किती जण होते? अशी उत्तरं दिली जातात. हे काही समस्येवरील उत्तर नाही. तर, नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने कसे सुरू होतील, त्यांना मदत कशी होईल, अशी उत्तरं दिली पाहिजेत. त्यांना दुबार पेरणी करायची असेल तर बियाणं परत कसं मिळेल हे त्याचं उत्तर पाहिजे. या समस्यांचं कोणी बोलतच नाही, असे पवार म्हणाले. फक्त वरवर घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.