मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आता शिवसेनेवर (Shivsena) वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे कार्यकारिणीचे सदस्य लिलाधर डाके आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली होती.
बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी एकनाथ शिंदेनी खास रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंनी गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी शस्त्रक्रिया झालेले खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतली होती.
एकनाथ शिंदेंना या भेटीमागचं कारण विचारले असता, मी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटत आहे. मात्र या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. त्यांचे आर्शीवाद उपयोगी पडणार आहेत, असं एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलाताना स्पष्ट केलं. तसेच राज्यात नवीन जबाबदारी घेतल्यानंतर त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, असं एकनाथ शिंदेंनी यावेळे सांगितलं.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. परंतु एक महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जात आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येत्या २-३ दिवसांत कॅबिनेटचा विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विस्तारासाठी कुठलीही डेडलाईन दिली नाही त्यामुळे विस्तार कधी होणार यावरून चर्चा सुरू झाली आहे.
४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार- शिवसेना नेते आदित्य ठाकरे
बंडखोरांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसाला आहे. ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसाल्यानं दुःख वाटत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना आव्हान देखील दिलं आहे. राजीनामा देण्याची कोणाची हिम्मत नाही. हे गद्दार आहेत अन् ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तसेच कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे. राक्षसी महत्वाकांशा घेऊन हे सरकार आलं आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.