मुंबई/गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
गोरेगावातील एका महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड रोष पसरला आहे. शनिवारी आ. सहषराम कोरोटे, अभिजित वंजारी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बन्सोड व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेत हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे व एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात पोलीस महासंचालकांशीदेखील चर्चा केली.
अशी घडली घटना
पतीने सोडून दिल्याने पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. पायी जाताना एकाने मदतीच्या बहाण्याने आपल्या चारचाकीमध्ये बसविले आणि त्यानंतर दोन दिवस बलात्कार केला.
पीडितेला तिथेच सोडून आरोपीने पळ काढला. ती कशीबशी जंगलातून निघून भंडारा जिल्ह्यातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे घरी सोडून देण्याच्या बहाण्याने अन्य दोन आरोपींनी पाशवी अत्याचार केला व तिला तिथेच सोडून पळ काढला. २ ऑगस्ट रोजी सकाळी ती विवस्त्र अवस्थेत शेतात आढळली. स्थानिकांनी कारधा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलीसही हादरले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी महिलेला सर्वप्रथम कपडे घातले. त्यानंतर तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला पाठवण्यात आले.
चित्रा वाघ यांनी पीडितेची घेतली भेट
बलात्काराच्या केसेस निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष न्यायालय असावे, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असून, त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. गोंदियाच्या अत्याचार पीडितेची शनिवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाघ यांनी भेट घेतली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण पीडितेने डॉक्टरांकडे सांगितलेल्या माहितीनुसार चार आरोपी आहेत.