मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले आहे. शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. याशिवाय महिनाभरापूर्वी शिंदे यांना मारण्याची धमकी देणारे पत्र मंत्रालयात आले होते, तर धमकीचा एक निनावी फोनही आला होता. यापूर्वी मागील सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना वारंवार येणाऱ्या धमक्यांचा स्रोत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी शोधावा असे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तवार्ता विभागाला दिले आहेत. पीएफआयविरोधात महाराष्ट्रात झालेल्या कारवाईचा या धमकी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपासही पोलीस करणार आहेत.
एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्यानंतर संरक्षण देण्यासाठी अनेक कार्यकर्ते वर्षा या निवासस्थानी जमले होते. त्यांचे आज एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. मराठा समाजातील असंख्य कार्यकर्ते आज माझ्या वर्षा या शासकीय निवासस्थानाबाहेर जमले होते. मला जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मला संरक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता. यावेळी त्यांना निवासस्थानी बोलवून त्यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे. तेथे योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. या संपूर्ण परिसराचा आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच त्यांना अति उच्च दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. ‘मातोश्री’च्या धर्तीवर ठाण्यातील शुभदीप या सोसायटीतील शिंदे यांच्या निवासस्थानालाही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या सोसायटीच्या बाहेर बॅरिकेड्स उभारून तेथे ये-जा करणाऱ्यांची चौकशी आणि तपासणीही केली जात आहे.
पोलिसांवर ताण वाढणार-
दसरा मेळावा तोंडावर आला असताना हा धमकीचा प्रकार समोर आल्याने पोलिसांवरील ताण वाढणार आहे. मुंबईत यंदा शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत होणार असून त्याला एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"