औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना काल अचानक हृदयविकाराची लक्षणे दिसत असल्याने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले. काल सायंकाळी 4.30 वाजता लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या आमदार शिरसाट यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिरसाटांची भेट घेतली.
काल आमदार संजय शिरसाट यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णालयातील डॉक्टरांनी संजय शिरसाट यांना पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. यानुसार, संजय शिरसाट यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला आणण्यात येत आहे. तिथे त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांची यापूर्वीही अॅन्जिओप्लास्टी मुंबईत झालेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली भेटशिरसाट यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल औरंगाबादेत एअरॲम्ब्युलन्स पाठवली. यातूनच शिरसाट यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल शिरसाट यांच्यावर सर्जरी झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉ. जलील पारकर हेदेखील तिथे उपस्थित होते. शिरसाट यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा सिद्धांत शिरसाट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी रुग्णालयात आहेत.