मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले- 'त्यांची तब्येत उत्तम...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 09:36 PM2022-11-04T21:36:02+5:302022-11-04T21:36:28+5:30
शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पवारांना निमोनिया झाल्याने त्यांच्यावर गेल्या चार-पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पवारांची भेट घेतली.
उद्धव ठाकरेही ब्रीच कँडीकडे रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशरद पवारांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले अन् तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील पवारांच्या भेटीसाठी मातोश्रीवरुन रवाना झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांची भेट होणार, अशी चर्चा सुरू झाली. पण, उद्धव ठाकरे येण्यापूर्वीच एकनाथ शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर पडले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदे म्हणाले की, "मी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांच्याशी बोललो. त्यांची तब्येत सध्या चांगली आहे. निमोनिया रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगले बोलले, त्यांची तब्येत उत्तम आहे. ते उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात सहभागी होणार आहेत", अशी माहिती शिंदे यांनी दिली.