लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी तीन दिवस रजेवर गेल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्याची माहिती दिली नसल्याने सुरुवातीला ते कुठे गेले याची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही याबाबत माहिती मिळत नव्हती. मुख्यमंत्री बाहेर गेले आहेत, एवढीच माहिती दिली जात होती. दरम्यान, मुख्यमंत्री तीन दिवस कुटुंबासोबत काश्मीरला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्याचेही सांगण्यात आले. २० जून २०२२ रोजी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. त्यानंंतर ३० जूनला शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. या सर्व घटनांना याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे.
एप्रिल महिन्यातदेखील मुख्यमंत्री तीन दिवस त्यांच्या गावी साताऱ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी गावाला एक पूजा केली होती, तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सुट्यावरून विरोधकांनी टीका सुरू केल्यावर मी सुट्यातदेखील नेहमीपेक्षा दुप्पट काम करत असल्याचा पलटवार करत शिंदेंनी विरोधकांचे तोंड बंद केले होते.
देवदर्शन अन् अधिकाऱ्यांशी चर्चा
देवदर्शन व पर्यटनासोबतच मुख्यमंत्री काश्मीरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. गेल्या रविवारीच शिंदे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा केली होती.