Join us  

शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "पळून कुठे जाणार होता?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 5:02 PM

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक करण्यात आली.

CM Eknath Shinde on Sculptor Jaydeep Apte Arrest : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर पोलिसांनी अटक केली. नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त अनावरण करण्यात आलं होतं. मात्र तो पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला होता. बरेच दिवस जयदीप आपटेचा पोलिसांकडून शोध सुरु होता. बुधवारी कल्याण पोलिसांनी आपटलेला त्याच्या घराखालून अटक केली आणि सिंधुदूर्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटोला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुतळा कोसळ्याच्या घटनेपासून जयदीप आपटे फरार झाला होता. अखेर ११ दिवसांनी कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आपटेच्या अटकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पळून पळून कुठे जाणार होता? असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

"पळून पळून कुठे जाणार आहे? गृहखातं आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून कोणीच वाचू शकत नाही. त्याला आता अटक करण्यात आली आहे.  त्याची चौकशी होईल. कठोर कारवाई होणार असून कुणालाही क्षमा नाही. जे लोक अफवा पसरवत होते त्यांना या माध्यमातून एक चपराक मिळाली आहे. जे काही घडलं ते दुर्दैवी आहे पण त्यापेक्षा जास्त या विषयाचा राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा राहील यावर आम्ही आता काम करत आहेत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

२६ ऑगस्ट रोजी शिल्पकार जयदीप आपटेने बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला. पोलिसांनी जयदीप आपटेविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. अखेर बुधवारी जयदीप आपटेला कल्याणमध्ये पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आपटेला मालवणमध्ये आणत न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्या १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

टॅग्स :सिंधुदुर्गएकनाथ शिंदेपोलिस