'शाळेतील सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही'; एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 03:09 PM2022-09-28T15:09:04+5:302022-09-28T15:10:33+5:30
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची? असं विधान आमदार छगन भुजबळांनी केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.
स्वामीनारायण यांच्या कृपेनेच मी मुख्यमंत्री झालो, CM शिंदेंनी भक्तांसमोर सांगितलं
छगन भुजबळांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही. जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.
हिंदू देवतांचा राग का?
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हिंदु धर्मीयांचा अपमान केला आहे. कुठल्याही महापुरुषाचा अपमान कुणीही केला नाही. परंतु जाणूनबुजून भुजबळांनी शाळेत सरस्वती, शारदा मातेचा फोटो का असावा? असे तारे तोडले आहेत. हिंदु महासंघ या विधानाचा आक्षेप करतो. महाराष्ट्रात विरोधी पक्षात आल्यानंतर जातीवाद करायचा हे राष्ट्रवादीचं जुन धोरण छगन भुजबळ अंमलात आणत आहेत. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं विधान ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे.