मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळच्या केईएम रुग्णालयाला अचानक भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील संवाद साधून त्याना मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांना कोणत्याही बाबतीत गैरसोय होते अथवा नाही तेदेखील जाणून घेतले.
यानंतर केईएम रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले सहा वॉर्ड देखील त्यांनी पाहिले. ते बंद ठेवण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते जाणून घेऊन हे विभाग तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. रुग्णांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यात कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात काही ठिकाणी उघड्यावर दिसणाऱ्या विद्युत वाहिन्या नीट झाकण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या दुधाच्या दर्जाबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केल्याने रुग्णांना तत्काळ चांगल्या दर्जाचे दूध उपलब्ध करून द्यावे असेही त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना बजावले.
केईएम रुग्णालय हे मुंबईतील 100 वर्षाहून अधिक जुने आणि नावाजलेले रुग्णालय असल्याने येथील सोयी सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तसेच रुग्णालयातील बंद असलेले सहा वॉर्ड पुन्हा सुरू झाल्यास 450 अधिक बेडस रुग्णासाठी उपलब्ध होऊ शकतील त्यामुळे या रुग्णालयावरील ताण बऱ्याच अंशी कमी होऊन जास्तीत जास्त रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल यासाठी हे वॉर्ड लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करावेत असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.