प्रति शिवसेना भवन; शिंदे गट दादरमध्येच उभारणार प्रशस्त मध्यवर्ती कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 06:14 AM2022-08-13T06:14:41+5:302022-08-13T06:14:46+5:30

दादरमध्ये आपल्या पक्षाचे प्रशस्त कार्यालय असावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.

Chief Minister Eknath Shinde wants his party to have a spacious office in Dadar. | प्रति शिवसेना भवन; शिंदे गट दादरमध्येच उभारणार प्रशस्त मध्यवर्ती कार्यालय

प्रति शिवसेना भवन; शिंदे गट दादरमध्येच उभारणार प्रशस्त मध्यवर्ती कार्यालय

googlenewsNext

मुंबई : शिवसेना भवन म्हटले की डोळ्यासमोर येते ते दादरमधील शिवसेनेचे पाच मजली कार्यालय. येथून शिवसेनेला दिशा देणारे अनेक निर्णय, घोषणा आधी बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरेंनी केल्या. शिवसेनेला शह देण्यासाठी आता शिंदे गटही सरसावला आहे. दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. दादरमध्ये आपल्या पक्षाचे प्रशस्त कार्यालय असावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. मुंबईतील लोकांना एकनाथ शिंदेंना भेटता यावे, त्यांच्या समस्या मांडता याव्यात यासाठी हे प्रशस्त कार्यालय शिवसेना भवनाजवळच उभे केले जाणार आहे.

नावाबाबत समर्थकांमध्ये उत्सुकता, एकनाथ शिंदे स्वत: निर्णय घेणार

शिंदे गट दादरमध्ये आपले मध्यवर्ती कार्यालय उभारणार असला तरी त्यांना या कार्यालयाला शिवसेना भवन नाव देता येणार नाही. शिवसेना भवन, शिवालय, शिवसेना शाखा हे शिवसेनेशी संबंधित शब्द आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यालयाचे नाव काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतील या कार्यालयाचे नाव ते स्वतःच ठरवणार आहेत. शिवसेना भवनाजवळच शिवाजी पार्क, बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ, माँ साहेबांचा पुतळा, सावरकर स्मारक अशी बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे आहेत. त्यामुळेच शिंदे गटाचे कार्यालय याच भागात उभारण्याचा निर्णय घेऊन ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न आहे. 

ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया नाही

शिंंदे गटाच्या या हालचालींबाबत शिवसेनेतील काही नेत्यांना प्रतिक्रिया विचारली असता, अशा फालतू गोष्टींवर आपण प्रतिक्रिया देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय

दादरमधील मुख्य कार्यालयाबरोबरच शिंदे गटाचे प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय उभे केले जाणार आहे. या कार्यालयात लोकांना आपल्या समस्या घेऊन तिथले शिंदे गटाचे नगरसेवक, आमदार, पदाधिकारी यांना भेटता येईल, अशी यामागची कल्पना आहे. अशा प्रकारे मूळ शिवसेना फोडून शिंदे गट मोठा करण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न आहे.
 

Web Title: Chief Minister Eknath Shinde wants his party to have a spacious office in Dadar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.