मायबोलीसाठी केंद्रात जाणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; विश्व मराठी संमेलनाचे थाटात उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:32 AM2023-01-05T06:32:29+5:302023-01-05T06:33:16+5:30
वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम ( एनएससीआय) डोममध्ये ढोलताशे आणि तुतारीच्या निनादात पहिल्या विश्व मराठी संमेलनाला बुधवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली.
मुंबई : वारकरी संप्रदायातील थोर संतांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. पंढरपूरचा पांडुरंग महाराष्ट्राची खरी ओळख आहे. मराठीने फारसी-उर्दूसह अनेक भाषांना आपल्यात सामावून घेतले आहे. अशा या आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. निमित्त होते विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाचे. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम ( एनएससीआय) डोममध्ये ढोलताशे आणि तुतारीच्या निनादात पहिल्या विश्व मराठी संमेलनाला बुधवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली.
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, मराठी भाषा प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, आमदार यामिनी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
मराठी माणूस आपल्या कर्तृत्वा जगभर शिखर गाठत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जात-पात धर्म यापलीकडे जाऊन माणुसकी जपते ती भाषा वैश्विक ठरते. हा गुण मराठी भाषेत आहे. मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी सरकार नियम कायदे बदलायला तयार आहे. मुंबईसोबतच नागपूरमध्येही मराठीचा जागर सुरू आहे
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सर्व क्षेत्रांतील मराठी बांधव आणि भगिनींना एकत्र आणण्यासाठी हे संमेलन आहे. ७५० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माउलींनी 'आता विश्वात्मक देवे' असे म्हणत पसायदानाच्या रुपात वैश्विक दान मागितले. मराठी भाषेचे वैभव दर्शवणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. संत तुकाराम महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनीही मराठीला समृद्ध केले. वारकरी संप्रदायातील संतांनी विश्वाला विचार दिला. मराठी हा एक विचार आहे जो विश्व कल्याणाचा आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री