मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार मनपाच्या नवीन के-उत्तर वॉर्डचे उद्घाटन
By मनोहर कुंभेजकर | Published: October 8, 2024 07:07 PM2024-10-08T19:07:55+5:302024-10-08T21:52:58+5:30
Mumbai News: मुंबई महानगर पालिकेच्या के उत्तर नवीन वॉर्ड ऑफिसचे उद्घाटन व आरेतील अंतर्गत रत्याच्या दुरुस्ती कामाच्या भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार दि, ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या के उत्तर नवीन वॉर्ड ऑफिसचे उद्घाटन व आरेतील अंतर्गत रत्याच्या दुरुस्ती कामाच्या भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवार दि, ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या वॉर्डची संख्या आता २६ झाली आहे. हा नवीन वॉर्ड सुरु झाल्याने जोगेश्वरीकरांचे बरेच श्रम वाचणार आहेत
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात जोगेश्वरी, अंधेरी व गोरेगाव या विभागाचा समावेश होतो. गेल्या काही वर्षात या विधानसभेच्या लोकसंखेत वाढ झाल्याने या ठिकाणी नवीन वॉर्ड निर्माण करावा यासाठी जोगेश्वरी विधानसभेचे आमदार असताना महापालिका, राज्य शासन यांच्या बरोबर पत्र व्यवहार केला. विधीमंडळात विविध आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थीत केले होते. तब्बल १५ वर्षांचे प्रयत्न व पाठपुराव्यामुळे जोगेश्वरी पूर्व येथे महापालिकेचा नवीन वॉर्ड सुरु करण्यात येत आहे. के-उत्तर नावाने हा नवीन वॉर्ड ओळखला जाणारा असून तो पूनम नगर येथील मजास मंडई ज्याला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा माजास मंडई येथे सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार रवींद्र वायकर यांनी दिली.
आरेतील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन
आरेतील मुख्य रस्ता दिनकर देसाई मार्ग सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात आला त्याप्रमाणे आरेतील दुरावस्था झाली आहे.आपल्या पाठपुराव्यामुळे आरेतील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉंक्रीट करण्या ऐवजी डांबरीकरणासाठी तब्बल रुपये ६६ कोटीच्या कामास प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे. या कामाचे भूमिपूजन ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती खासदार वायकर यांनी दिली.
२३९ रहिवाशाना मिळणार घरांच्या चाव्या
जोगेश्वरी पूर्व येथील आदर्श मेघवाडी एस.आर.ए गृहनिर्माण संस्था हा प्रकल्प गेले अनेक वर्ष रखडला होता. येथील रहिवासी त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित होते. आपण यशस्वी मध्यस्थी करून रखडलेला प्रकल्प पूर्णत्वास नेला. येथील एकूण राहीवाशांपैकी २३९ रहिवाशाना घरांच्या चाव्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती खासदार वायकर यांनी दिली.