लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहीण करण्याचे काम करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 06:46 AM2024-10-14T06:46:21+5:302024-10-14T07:01:49+5:30
Chief Minister Eknath Shinde : ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई - बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत, या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे काम शासन करणार आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कांजूरमार्ग येथे १२८ कोटी रुपये खर्चातून मुंबई महानगपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. याप्रसंगी नेहरूनगर कांजूरमार्ग येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार नरेश म्हस्के, नगरसेविका सुवर्णा करंजे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महानगपालिकेच्या या रुग्णालयासाठी १२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शासनाने विविध रुग्णालयामध्ये कॅशलेस सुविधा देखील सुरू केली आहे. यासह महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. लेक लाडकी योजना, मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजनांमुळे महिलांना सक्षम होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दोन वर्षांत मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणार
मुंबई शहरातील रस्त्यांच्या कामाना प्राधान्य देण्यात येत आहे. दोन वर्षांत मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
भूमिपूजनसह विविध प्रकारच्या कामांना प्राधान्य
नेहरूनगर वसाहती मधील माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण यापूर्वी आपण केले आहे, नेहरूनगर येथील बुद्ध विहार, नागरिकांसाठी सिमेट्री, मुस्लिम नागरिकांच्या मागणीस देखील तात्काळ प्रतिसाद दिला आहे. मुस्लिम, बुद्ध, ख्रिश्चन, पारसी असे सर्व समाजातील नागरिकांच्यासाठी राज्य सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.