Join us

नाट्य परिषदेला १० कोटी देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 12:37 PM

गो. ब. देवल स्मृतिदिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी केलं जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुढील कामकाजासाठी शासनाच्या वतीने १० कोटी रुपये देण्यात येतील असे सांगत  शंभरावे नाट्य संमेलन भव्य दिव्य स्वरूपात करावे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री गो. ब. देवल स्मृतिदिन आणि पुरस्कार सोहळ्यात बोलताना काढले.

मुख्यमंत्री म्हणाले की, या पुरस्कार सोहळ्यामध्ये  मोहन जोशी आणि वंदना गुप्ते या दोन महान व्यक्तींचा सन्मान करण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे  नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या मनात नाट्यसृष्टीबद्दल तळमळ आहे.

दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजिला जातो. यशवंत नाट्य मंदिरामध्ये हा समारंभ बुधवारी झाला. सोहळ्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ४० वर्षांपासून नाट्यरंगभूमीशी निगडित राहून ८००हून अधिक नाटकांतून ५००० पेक्षा जास्त भूमिका सादर करणाऱ्या पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा विशेष सत्कारही झाला.

या सोहळ्याला साहित्यिक प्रेमानंद गजवी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त अशोक हांडे, विश्वस्त गिरीश गांधी, अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष नरेश गडेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके आदी उपस्थित होते.

जीवनगौरव पुरस्कार माझ्यासोबत काम केलेल्या सर्व दिग्दर्शक व कलाकारांचा आहे, असे मोहन जोशी म्हणाले. वंदना गुप्ते यांनी अल्पावधीत यशवंत नाट्य मंदिर पुन्हा सुरू होण्यासाठी अपार कष्ट घेणाऱ्या नाट्य परिषदेच्या ६० सदस्यांचे कौतुक केले. चालती-बोलती असताना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याचा आनंद   असल्याचेही त्यांनी सांगितले. अजित भुरे यांनी प्रास्ताविक केले. संजय मोने आणि अतुल परचुरे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. केदार शिंदे आणि संतोष पवार यांनी दादला नको गं बाई भारुड सादर केले.

आजही त्यांचा शो हाऊसफुल्ल

उदय सामंत म्हणाले की, ११ महिन्यांपूर्वी उदयास आलेल्या ‘’गुवाहाटी व्हाया सुरत’’ या नाटकाचे शिल्पकार मुख्यमंत्री आज उपस्थित आहेत. आजही त्यांचा शो हाऊसफुल्ल आहे. नाट्य परिषदेने केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज मुख्यमंत्री जातील. आज नाट्यगृह सुरू झाले नसते तर आपल्यालाही फेसबुक लाइव्ह करावे लागले असते. बॅकस्टेज आर्टिस्ट व कलाकारांच्या घरांचा प्रश्न सोडवायचा आहे. २५ कोटी फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदे