मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीशी फारकत घेत भाजपासोबत सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अल्पसंख्याक समुदायाला जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुस्लीम आणि इतर समुदायाची मोट बांधण्यात येत आहे. त्यासाठी आज मुंबईत राज्यस्तरीय शिवसेना अल्पसंख्याक मुस्लीम मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा संध्याकाळी होणार आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील. या मेळाव्याचे आयोजक सईद खान म्हणाले की, आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा वापर केला आहे. परभणी जिल्ह्यात आमच्या समाजाची ५ मुले सेफ्टीटँकमध्ये बुडून मृत्यू झाला. एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी तात्काळ त्यांना पीडित कुटुंबाला आर्थिक मदत केली. मुस्लीम समाजाच्या विकासासाठी ४० कोटी निधी दिला. आजपर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी इतका निधी मुस्लीम समुदायाला दिला नाही. एकनाथ शिंदे ज्याप्रकारे काम करतायेत त्यामुळे अल्पसंख्याक समुदायात विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे ताकदीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहू असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यभरातून या मेळाव्यासाठी नागपूर ते मुंबई मुस्लीम समाजाचे नगरसेवक, डॉक्टर्स, विकासक आणि अन्य प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहे. किमान ८-१० हजार लोक या मेळाव्याला येतील. प्रभागाचा विकास, समाजाचे शिक्षण यासारख्या १८ मागण्या या मेळाव्यातून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवणार आहोत. १०० टक्के या मागण्यांचा सकारात्मक विचार मुख्यमंत्री करतील हा विश्वास वाटतो असंही आयोजक सईद खान यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लीम समाजाच्या ज्या मागण्या रखडल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मुख्यमंत्री शिंदे काम करत आहेत. आम्हाला १०० टक्के मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. विविध पक्षाचे ३०० नगरसेवक, नगराध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुस्लीम समाजाला काँग्रेस राष्ट्रवादीने आता त्यांची व्होट बँक समजू नये असं सईद खान म्हणाले त्याचसोबत समान नागरी कायदा यासंदर्भात आमचे धर्मगुरू हे वरच्या पातळीवर चर्चा करत आहेत ते निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितले.