- सीमा महांगडे मुंबई - नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लाखो महिला पहाटेपासून घराबाहेर पडतात. या महिलांना ज्याप्रमाणे आपण रोजगार देतो, त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी देखील आपली आहे. त्यामुळे मुंबई महानगरात महिला सुरक्षा अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिले आहेत. यासाठी महानगरपालिका आणि मुंबई पोलिस यांनी एकत्रित येत अभियान राबवावे, असेही त्यांनी नमूद केले.
महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने बळकटी दिली आहे. महाराष्ट्र शासनाकडूनही महिला सशक्तीकरणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने देखील महानगरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. यापैकी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही महिला बचत गटांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासह तब्बल ७० हजार आकांक्षित भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) अनुदान जमा करण्यात आले. तसेच दिव्यांग स्वयंरोजगार योजना, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभार्थ्यांनाही अनुदान वाटप करण्यात आले. पालिका ही महिला बचत गटांच्या माध्यमातून मुंबई महानगरातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करीत असून गृहउद्योगांच्या माध्यमातून मुंबईतील लाखो महिला आज स्वत:च्या पायावर उभ्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेद्वारे प्रत्येक बचत गटाला पालिका एक लाख रुपये देणार आहे. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या विविध योजना आणि उपक्रमांमध्ये केवळ महिलाच नव्हे तर दिव्यांग, तृतीयपंथी या सर्वांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी अभ्यासिका, महिलांसाठी वसतिगृह या सुविधा देखील खूप महत्वपूर्ण आहेत. आकांक्षित महिला योजनेतून मिळणारा धनलाभ हा थेट महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय हा भाऊ या सर्व भगिनींच्या पाठीशी सदैव उभा आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोगतातून दिली. नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना सुरू झाली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जात असून केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील महिला अधिकाधिक सक्षम होत आहेत.- दीपक केसरकर, पालकमंत्री, मुंबई शहर बचत गटातील महिलांच्या कष्टाला कौशल्याची जोड देणे काळाजी गरज आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच ३१ मे रोजी संपूर्ण मुंबई महानगरात किमान कौशल्य विभागामार्फत ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला कौशल्य विभाग’ सुरू करण्यात येणार आहे. या विभागात महिन्यातील तीन दिवस बचत गटांच्या महिला सदस्यांसाठी विपणन आणि प्रसिद्धीचे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येणार आहे.- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, पश्चिम उपनगर केवळ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी यांनादेखील नियोजन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या परिघात पालिकेने आणले आहे. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात आपण दिव्यांग व्यक्तींकरिता ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ १ एप्रिल २०२४ पासून सुरू करीत आहोत.- सुधाकर शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त