'सव्वा वर्षांपासून आम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतोय, तेच मुख्यमंत्र्यानी सांगितलं'
By महेश गलांडे | Published: March 2, 2021 02:45 PM2021-03-02T14:45:19+5:302021-03-02T14:45:54+5:30
ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. 'देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे.
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींना सरकारनं दिलेलं भाषण एखादं चौकातलं भाषण वाटतं. त्यात यशोगाथाच नव्हे, केवळ आणि केवळ व्यथाच दिसतात, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं आहे.
ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. 'देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. पण देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के कोरोना रुग्ण राज्यात आहेत. सक्रिय रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या राज्यात ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,' अशी आकडेवारी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरही त्यांनी टीका केली.
सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न!
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 2, 2021
पण, २१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होते.
मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही.
नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले!
सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न, आहे. पण, २१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होतं. मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. नेमके हेच सव्वा वर्षांपासून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण, तुम्हीच सांगितले हे बरे केले!, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना उपरोधात्मक टोलाही लगावला. तसेच, कोरोनाच्या काळातसुद्धा भ्रष्टाचार करण्याचे काम झाले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे कशाला म्हणतात, याचा अर्थ सरकारने समजावून सांगितला, असा आरोपही फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केला.
एका स्टुलाची गोष्ट
तीन पक्षांचं सरकार अनेक गोष्टींमध्ये दिरंगाई करत असल्याची टीका त्यांनी केली. 'एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मग मंत्रालयाकडून त्या विभागाला तुम्ही स्टूलची उंची किती हवी तेच नमूद केली नसल्याचं पत्रातून कळवलं जातं. उंची नमूद केल्यावर स्टूल लाकडी हवा की लोखंडी की फायबरचा याबद्दल मंत्रालयातून विचारणा होते. त्याला पत्रानं उत्तर दिल्यावर स्टूलाला किती पाय हवेत असा प्रश्न विचारला जातो. मग पुन्हा स्टूलाचं वजन किती हवं याची विचारणा होते. शेवटी तो स्टूल काही संबंधित विभागाला मिळत नाही. मग एखादी घटना घडल्यावर मंत्रालयातून स्टूलाबद्दल विचारलं जातं. तेव्हा संबंधित विभाग पत्रव्यवहाराचे इतके कागद झाले की आम्ही आता त्यांचाच स्टूल म्हणून वापर करत असल्याचं सांगतो,' असा किस्सा सांगत फडणवीसांनी ठाकरे सरकारला चिमटा काढला.