रत्नागिरी-सिंधुदुर्ग उमेदवारी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी 'हात जोडले'; राणे प्रचाराला लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 04:10 PM2024-04-05T16:10:40+5:302024-04-05T16:38:10+5:30
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती.
मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असूनही काही जागांवर अद्यापही उमेदवार निश्चित झाले नाहीत. महाविकास आघाडी आणि महायुती असा महाराष्ट्रात राजकीय सामना होत आहे. राज्यातील ४८ पैकी बहुतांशी जागांवरील दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. मात्र, अद्यापही काही जागांवर उमेदवारीवरुन राजकीय खलबतं सुरू आहेत. त्यात, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, हातकणंगले, ठाणे, कल्याण या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यातच, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपा आग्रही असून शिवसेनेनंही दावा केला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, त्यांनी उत्तर देणे टाळले.
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील इच्छुक होते. अशातच मंगळवारी रात्री उशिरा किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माघार घेतली. त्यामुळे नारायण राणेंचा मार्ग मोकळा झाला आहे, अशीही चर्चा रंगली आहे. यापूर्वी माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनीही या जागेवर दावा केला होता. त्यावरुन, भाजपाला आपल्या शैलीत फटकारलेही होते. मात्र, त्यांचाही आवाज कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे, भाजपाने ही जागा शिंदेंकडून खेचून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, नारायण राणेंनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हेही महायुतीच्या उमेदवारासाठी मतदारसंघात जोमाने फिरत असल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भाजपाकडून दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच, एका ठिकाणी उमेदवार बदलल्याची आणि काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यावर, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे, काही जागांबाबत वेगळे निर्णय झाले आहेत. मात्र, ज्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं नाही, त्यांचाही पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरील उमेदवारीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी हात जोडून उत्तर देणे टाळल्याचे दिसून आले. एबीपी माझाने एकनाथ शिंदेंना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर टाळले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अलिबाग दौऱ्यावर आहेत.
किरण सामंतांची माघार, उदय सामंतांचे उत्तर
मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेबाबत नागपूरमधील पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून इतर नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सामंत यांनी माघार घेतली, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आधी शिवसेनेचे खासदार जिंकले. त्यामुळे शिंदे गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र, या जागेमुळे नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जागेसाठीची वाटाघाटी थांबली आहे.