Join us

नाना पटोलेंवर मुख्यमंत्री पाळत ठेवतात, फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 4:12 PM

नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमधील दोन्ही सहकारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने सहकारी पक्षांच्या पायाखलची वाळू सरकली आहे, असे म्हणत माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप पटोले यांनी केला होता.

ठळक मुद्देनाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच त्यांच्यावर पाळत ठेवायची गरज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना का भासत आहे, याचा उत्तर तेच देऊ शकतात, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नानांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. 

नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमधील दोन्ही सहकारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने सहकारी पक्षांच्या पायाखलची वाळू सरकली आहे, असे म्हणत माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप पटोले यांनी केला होता. त्यावर, आता भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना कापरं भरलं आहे. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी असे नाना पटोले यांच्या वक्तव्यातून आम्हाला वाटतंय. मात्र, नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच त्यांच्यावर पाळत ठेवायची गरज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना का भासत आहे, याचा उत्तर तेच देऊ शकतात, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीने पटोलेंना दिलं प्रत्युत्तर 

'एखाद्या पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची, त्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या दौऱ्यांची माहिती पोलीस दलातील एक विशेष विभाग ठेवतो. सुरक्षेसाठी ही माहिती ठेवली जाते. त्यात नवीन काहीच नाही. नाना पटोले माहितीअभावी बोलत आहेत. त्यांनी माहिती घेऊन बोलावं,' असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. 'नाना पटोलेंच्या पक्षात अनेक माजी मुख्यमंत्री आहेत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना कार्यपद्धतीची कल्पना आहे. पटोलेंनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी आणि बोलावं,' असा सल्लादेखील त्यांनी दिला.

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेत केलेल्या एका विधानानं खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आपण त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत, परंतू त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पदे आहेत. यामुळे त्यांच्याकडून असे यापुढेही होणार आहे, असे पटोले म्हणाले. मी रात्री ३ वाजता दौऱ्यावर निघालो ते देखील त्यांना तेव्हाच माहिती होते, असा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनाना पटोलेकाँग्रेसअजित पवारउद्धव ठाकरे