महाजनादेश यात्रा सोडून मुख्यमंत्री आज मंत्रालयात; पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:59 AM2019-08-07T04:59:27+5:302019-08-07T05:00:01+5:30
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येणार
मुंबई : मुंबई, ठाणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील भीषण पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांची महाजनादेश यात्रा सोडून मुंबईत परतणार असून राज्य मंत्रिमंडळाची बैठकही बुधवारी होणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ती बुधवारी सकाळी बुलडाणा येथून सुरू होणार होती. त्याऐवजी मुख्यमंत्री मुंबईत परतून मंत्रिमंडळ बैठक घेणार आहेत. दुपारी ते महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू करतील.
पुरग्रस्त भागात १६२ वैद्यकीय पथके कार्यरत
राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी १६२ वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्य$ंत सुमारे १४ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.