Join us

मुख्यमंत्री निघाले डावोसला

By admin | Published: January 02, 2015 2:03 AM

स्वित्झर्लंडमधील डावोस येथे २१ ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत.

२१ ते २५ जानेवारी दरम्यान : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक मुंबई : स्वित्झर्लंडमधील डावोस येथे २१ ते २५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. जगातील बड्या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करता यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फडणवीस यांना या बैठकीस जाण्यास सांगितले आहे. डावोसमधील या बैठकीला जागतिक महत्त्व आहे. दरवर्षी जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी आणि जगातील नामवंत कंपन्यांचे सर्वेसर्वा या निमित्ताने एकत्र येतात. अब्जावधी रुपयांच्या गुंतवणुकीबाबतचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात. महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या क्षेत्रांत असलेली गुंतवणुकीच्या संधीची आणि सवलतींची माहिती उद्योग जगतातील वर्ल्ड लिडर्सना देऊन त्यांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण मुख्यमंत्री देणार आहेत. त्यांच्यासोबत विशेषत: उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारीही जाणार आहेत. या बैठकीत मांडावयाच्या भूमिकेबाबत सध्या वित्त आणि उद्योग विभागाची जोरदार तयारी सुरू आहे. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची संख्या फडणवीस सरकारने ७५ वरून अलिकडेच केवळ २५ वर आणली आहे. (विशेष प्रतिनिधी)