वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी मुख्यमंत्री डाओसला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:14 AM2018-01-22T04:14:18+5:302018-01-22T04:14:37+5:30
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४८व्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पहाटे स्वित्झर्लंडमधील डाओसला रवाना झाले. या परिषदेत मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग, तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.
मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४८व्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पहाटे स्वित्झर्लंडमधील डाओसला रवाना झाले. या परिषदेत मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग, तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्यातील वरिष्ठ अधिका-यांचे शिष्टमंडळ या परिषदेत विविध उद्योग समूहांशी महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांचा समावेश आहे. विविध उद्योगांसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देणे, राज्यातील पायाभूत सुविधांबाबतच्या प्रस्तावित प्रकल्पांच्या उभारणीत सहकार्य घेण्याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असून, पुढील महिन्यात होणा-या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८’ या उद्योग परिषदेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
‘क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन फ्रॅक्चर्ड वर्ल्ड’ हे यंदाच्या जागतिक परिषदेचे सूत्र आहे. विविध जागतिक आव्हानांना तोंड देताना सामायिक आर्थिक-औद्योगिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहयोगाने प्रयत्न करण्यासंदर्भात निर्धार या परिषदेत केला जाणार आहे, तसेच आर्थिक-औद्योगिक विषयाशी संबंधित बाबींवर चर्चासत्रांच्या माध्यमातून मंथन होणार आहे. या परिषदेस जगभरातून शंभरहून अधिक देशांतील जवळपास अडीच हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत.