तोंडाला पाने पुसली : स्वस्त घरे, झोपडपट्ट्यांच्या पाण्याचे मुद्दे उपस्थितमुंबई : राज्यभरातील प्रलंबित प्रकल्प आणि नागरिकांचे गंभीर प्रश्न ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबईतील सहा खासदारांना प्रश्न मांडण्यासाठी प्रत्येकी ३ मिनिटे याप्रमाणे केवळ १८ मिनिटांचा वेळ मिळाला. त्यामुळे खासदारांना केवळ दोनच प्रश्न मांडता आले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना व्यक्त होते आहे.खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबईमध्ये परवडणारी घरे मिळत नसल्याकडे लक्ष वेधले. मोठ्या प्रमाणात करआकारणी होत आहे. त्यामुळे घरांच्या किमती अधिक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पालघर, गुजरात, कर्नाटकच्या धर्तीवर मुंबईत स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी शेट्टी यांनी केली. न्यायालयाने झोपड्यांत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असूनही महापालिकेतील शिवसेना नेते पाणी देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.खासदार अरविंद सावंत यांनी बीपीटीच्या जमिनीवरील १९९५ पूर्वीच्या अधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले. कुलाबा येथील आंबेडकर नगरात समुद्रकिनाऱ्यावरील तिवरे तोडून अनधिकृत झोपड्या उभारण्यात येत आहेत. महापालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन आपल्या हद्दीत ही जमीन येत नसल्याचे सांगत दुर्लक्ष करीत आहे, असा मुद्दा सावंत यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)