Join us

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : सेंट कोलंबिया, बालमोहन, मायकेलची बाजी; सरकारी शाळांमध्ये पोयसर स्कूल अव्वल  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 3:18 PM

राज्यस्तरावर सरकारी शाळांमध्ये वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेने, तर खासगी विभागात नाशिकच्या एस्पेलियर हेरिटेज स्कूलने प्रथम पारितोषिक पटकावले आहे.

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात मुंबईत पोयसर स्कूल (हिंदी), शिवडी क्रॉस रोड एमपीएस स्कूल, केंद्रीय विद्यालय (आयएनएस हमला) यांनी सरकारी शाळांमध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर, खासगी शाळांमध्ये सेंट कोलंबिया, बालमोहन विद्यामंदिर, मायकेल इंग्लिश स्कूल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे. 

राज्यस्तरावर सरकारी शाळांमध्ये वाशिमच्या साखरा जिल्हा परिषद शाळेने, तर खासगी विभागात नाशिकच्या एस्पेलियर हेरिटेज स्कूलने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. मुंबई उपनगरातील खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, ठाण्यातील बिर्ला सेकंडरी स्कूल, पालघरमधील आस्पी चिल्ड्रन अकॅडमी यांनी खासगी शाळांच्या गटात अव्वल कामगिरी केली आहे.  सरकारी शाळांच्या गटात ठाण्याची वाशिंद जिल्हा परिषद, पालघरची नवघर जिल्हा परिषद आणि एन. पी. रोहा उर्दू स्कूलने बाजी मारली आहे.

राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक हेदवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने (कर्जत) आणि तृतीय क्रमांक घालेवाडी जिल्हा परिषद शाळा (कवठेमहांकाळ) यांनी मिळविला. शालेय शिक्षणमंत्री  दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली. पारितोषिक प्राप्त शाळांना ५ मार्चला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

१८ लाख मुलांची वाचन सवय प्रतिज्ञा गिनीज बुकात१८ लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञामध्ये सहभाग घेतला असून, शिक्षण विषयक हस्तलिखित स्पर्धेत १३ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याची दखल ‘गिनीज बुक’ने घेतली आहे.

‘नियमतपणे उपक्रम’विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी, शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले. शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात आहे.

६६ कोटींची बक्षिसे - राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस ५१ लाख, द्वितीय क्रमांकास २१ लाख आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस ११ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. - बृहन्मुंबई महापालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख व तिसरे पारितोषिक ७ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.- विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख, तिसरे सात लाखांचे, जिल्हास्तरावर पहिले ११ लाख, दुसरे पाच लाख, तिसरे तीन लाख रुपये, तर तालुकास्तरावर पहिले तीन लाख, दुसरे दोन लाख, तिसरे एक लाख रुपये, अशी ६६ कोटी १० लाखांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :शाळामुंबई