Join us

पोहोरादेवी गडावरील गर्दीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, कारवाईचे आदेश

By महेश गलांडे | Published: February 23, 2021 7:27 PM

सुमारे १५ दिवसानंतर संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहोरादेवी गडावर सर्व समाध्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे चालली.

ठळक मुद्देकोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम मोडून गर्दी केली जात असेल, तर संबंधितांवर जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) अनेक दिवसांनंतर प्रथमच जनतेसमोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी, मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. संजय राठोड यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले, असे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेत्यांनी कारवाईची मागणी केली होती. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील गर्दीची दखल घेतली आहे.  

सुमारे १५ दिवसानंतर संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहोरादेवी गडावर सर्व समाध्यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे चालली. पत्रकार परिषदेची सुरुवातच संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचे नाव घेऊन केली आणि आपली बाजू मांडली. मात्र, पोहोरादेवी या बंजार समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या गडावर राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर आणि महाविकास आघाडीच सरकावर टीकास्त्र सोडले. तसेच, मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी भाजपाने केली होती. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याची दखल घेतली पोहोरादेवी गडावर झालेल्या गर्दीसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम मोडून गर्दी केली जात असेल, तर संबंधितांवर जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वाशीम जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना याबाबतचा अहवाल मुख्य सचिवांना देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा या निवासस्थानी बैठक घेतली, तसेच कोरोना रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्याही सूचना केल्या आहेत. 

निलेश राणेंची टीका

''शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे'', असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला. 

संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय

सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो. मीडियासमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. संजय राठोड यांनी महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. केवळ सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड करत आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडताहेत की काय, अशी शंका यामुळे निर्माण होत आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

चित्रा वाघ यांचीही टीका

आताच्या घडीला बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरले. समाजाला वेठीस धरायचे हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो, असे म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.  

टॅग्स :वाशिमसंजय राठोडमुख्यमंत्रीउद्धव ठाकरेपूजा चव्हाण