लावणीसम्राज्ञी यमुनाबाईंना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 06:06 PM2018-05-15T18:06:12+5:302018-05-15T18:06:12+5:30
लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई- लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेल्या लावणीच्या प्रसारासाठी यमुनाबाईंनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. लोकनाट्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोठे योगदान असणाऱ्या यमुनाबाईंचे कलावंतांच्या नव्या पिढीला नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासणाऱ्या यमुनाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेच्या विकासाचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक अढळ तारा निखळला आहे.
यमुनाबाई वाईकर यांचे निधन
ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 102 वर्षाच्या होत्या. वाईच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यमुनाबाईंना कलेतील योगदानामुळे भारत सरकारने 2012मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
अल्प परिचय - (जन्म 31 डिसेंबर 1915)
यमुनाबाईंचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे होते. त्या राहात असलेली वाईची कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे लोककलेचे माहेरच होते. यमुनाबाई दहा वर्षांच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर जाऊ लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची अदाकारी याचे धडे मिळत राहिले.
लोकनाट्यातून नाटकांकडे -
अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ’मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. ’महाराची पोर’ नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.