Join us

रामदास कदम यांनी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

By मनोहर कुंभेजकर | Published: August 09, 2023 8:36 PM

सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ४० पदाधिकाऱ्यांनी दिले राजिनामे?

मुंबईएककिडे शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव व शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक  राजिनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे दिल्याची घटना ताजी असतांनाच रामदास कदम यांनी वडाळा येथील केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.

रामदास कदम यांनी दि,२ ऑगस्ट रोजी वडाळा येथील शिंदे गटाचे पदाधिकारी दिनेश कदम,नासिर अन्सारी,विनायक रोकडे,समीर ठाकूर,उमेश माळी यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या.या घटनेला ४८ तास उलटून गेल्यावर दि,४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नियुक्त्यांना स्थगिती दिली. दरम्यान रामदास कदम यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांनीच ब्रेक लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सिद्धेश कदम यांची मनमानी कारभारामुळे दिले राजिनामे?

सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभारा मुळे या तीन विधानसभा क्षेत्रात शिंदे गटात धूसपूस वाढली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आम्हाला पदाधिकाऱ्यांच्यानेमवेणूका करतांना विश्वासात घेतले जात नाही,पक्षात काम करू दिले जात नाही,चांगल्या पदाधिकाऱ्यांना काढून गुंड प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या जातात.परिणामी चांगले कार्यकर्ते पक्षा पासून दूर जात असून पक्षाची प्रतिमा देखिल मलिन होते.महिला पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरून शिवीगाळ केली जाते,तर वरिष्ठांकडून पदाधिकाऱ्यांना नीट वागणूक दिली जात नाही. त्यामुळे आम्ही सामूहिक राजिनामे देत असल्याचे या नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान मध्यरात्री १२.३० वाजता नरेश म्हस्के,संजय मशीलकर आणि डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पीएचा फोन आला होता. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून आज आपल्याला बैठकीची वेळ देतो असे चारकोप विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख संजय सावंत यांनी लोकमतला सांगितले.तर मालाड-कांदिवली व चारकोप विधानसभा क्षेत्रातील शिंदे गटाच्या नाराज पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी ४ वाजता वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावले होते.पदाधिकारी वर्षा बंगल्यावरच असून थोड्या वेळेत नाराज गटाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याचे समजते. 

टॅग्स :मुंबई