शिवपुण्यतिथीसाठी मुख्यमंत्री रायगडावर
By admin | Published: April 3, 2015 10:37 PM2015-04-03T22:37:31+5:302015-04-03T22:37:31+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३५ वा पुण्यतिथी सोहळा शनिवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येत असून यानिमित्त मुख्यमंत्री
महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३५ वा पुण्यतिथी सोहळा शनिवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येत असून यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
शिवपुण्यतिथीनिमित्त छत्रपती रायगडावर स्मारक मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसांपासून गडावर विविध कार्यक्रम होणार आहेत. पहाटे ५ वा. श्री जगदीश्वर मंदिर अभिषेक, शिवाभिषेक पालखी मिरवणूक तसेच दरबार सभागृहात अभिवादन सभा होणार आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशीकांत महावरकर यांनी गडावरील सर्व व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, डीवायएसपी शिवाजीराव देशमुख यांच्यासह विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच रायगडावर येत असून हा सोहळा यशस्वी पार पडण्यासाठी रायगडावर येत असून पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. (वार्ताहर)