पुरात अडकलेल्या 'त्या' 35 जणांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांनी केली एअरफोर्सला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 01:19 PM2019-08-04T13:19:36+5:302019-08-04T13:29:19+5:30
मुंबईसह राज्यात अतिवुष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्कालिन परिस्थितीतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले
मुंबई - मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. जोरदार होत असलेल्या अतिवृष्टीमुळे लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात अतिवुष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्कालिन परिस्थितीतील यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुरात अडकलेल्या खडवली नजिकच्या नांदखुरी येथील सुमारे ३५ ग्रामस्थांची हेलीकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करावी अशी विनंती भारतीय हवाई दलाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Maharashtra Government requests 6 more @NDRFHQ teams for Mumbai, Thane, Palghar in view of heavy rains. Also requests Indian Airforce for airlifting of around 35 villagers from Ju-Nandkhuri near Khandvali.#MumbaiRainsLiveUpdate#MumbaiRains@IAF_MCC
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 4, 2019
मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून ठाणे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना देखील ठिकठिकाणी सुरू असलेल्या मदत कार्याचे समन्वय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर मुंबई महापालिका आणि आपत्कालिन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून देखरेख करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.