Join us

मुख्यमंत्र्यांनी घेतला सहा मंत्र्यांच्या कामाचा आढावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 4:24 AM

आपल्या सरकारला पुढील महिन्यात चार वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई  - आपल्या सरकारला पुढील महिन्यात चार वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. एकूण सहा मंत्र्यांच्या चार वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी घेतला.सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या आढाव्याच्या पहिल्या दिवशी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यांनी राबविलेल्या प्रत्येकी पाच योजनांचे सादरीकरण फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. या बैठकीला मंत्री व संबंधित राज्यामंत्रीही उपस्थित होते.प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्र्यांना आपल्या कारकीर्दीत जनतेवर प्रभाव टाकणारे कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले याची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. उर्वरित मंत्र्यांच्या कामाचा आढावा येत्या २८ तारखेपर्यंत घेतला जाणार आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र