मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरुन मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. कारण, औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, राज्यातील शेतीला पाणी आहे. विरोधक नाहक दुष्काळ आहे म्हणतील, ते विनाकारण आंदोलन करायला लावतील. मात्र, सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, असे दानवे यांनी म्हटले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिना अखेरपर्यंत दुष्काळ जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे.
आमच्या सरकारच्या काळात दुष्काळ नाही, विरोधकांकडून विनाकारण दुष्काळ असल्याचा दावा केला जात आहे. सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, जर दुष्काळ असेल तर केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल, मी सरकार नाही की दुष्काळ जाहीर करेल, असे दानवे यांनी ब्रम्हगव्हाण उपसासिंचन कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी त्यांचे भाषणही थांबवले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महिना अखेरपर्यंत दुष्काळ जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या बहुतांश भागात यंदा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला असल्याने केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषांनुसार राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. या संदर्भात आढावा घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळ घोषित केला जाईल. केंद्रीय समितीने पाहणी केल्यानंतर याचा निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पेऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच वस्तुस्थितीची सातबाऱ्यावर नोंद करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या. कर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेऊनही ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.