Join us  

'त्यांनी' काही खोके बेळगावला पाठवले; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 9:39 AM

राज्यात ३८ वर्षांपासून सुरू असलेली सत्ताविरोधी लाट मोडून काढत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचे ध्येय सत्ताधारी भाजपने ठेवले आहे

मुंबई - महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात आज (10 मे) विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू झालं आहे. दिग्गज नेतेमंडळींसह  नागरिकांनीही सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच आपण मतदान करुन हक्क बजावण्यासाठी जनता राजकीय मैदानात उतरली आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्नाटकातील प्रचारात दिसून आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगलोरला जाऊन प्रचार केला. मात्र, त्यांनी बेळगावला खोके पोहोचवल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. 

राज्यात ३८ वर्षांपासून सुरू असलेली सत्ताविरोधी लाट मोडून काढत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचे ध्येय सत्ताधारी भाजपने ठेवले आहे. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी कर्नाटकमध्ये सभांचा धडाका लावल्याचं दिसून आलं. तर, काँग्रेसचं अख्ख गांधी घराणंही कर्नाटकमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी राज्यातील बहुतांशी भागांत सभा घेत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. दरम्यान, सीमाभागातील उमेदवारांसाठी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केला. तर, मुख्यमंत्री शिंदेंनी मंगळुरूत रॅली घेत भाजप उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं. 

सीमाभागात बेळगाव एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे. तर, मराठी माणसालाच मतदान करा, असे राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे, सीमाभागात नेमकं काय होणार, इथे कोणाचा वरचष्मा ठरणार हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदेंनी बेळगावला खोके पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय.  

आज कर्नाटक राज्यात विधान सभा निवडणुका होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे. हा 2024साठी शुभ शकुन आहे. दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हवणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मंगलोरमार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी मतदानादिवशीच केलाय. 

संजय राऊत यांनी ट्विट करुन केंद्रातील मोदी-शहांच्या नेतृत्त्वावर आणि राज्यातील मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे.. मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील, असेही राऊत यांनी म्हटलं. 

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेशिवसेना