लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर विकासकामांबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे उद्या, बुधवारी दिल्लीत दाखल होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे दिल्लीत दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने सत्तारूढ व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्रातील संभाव्य प्रकल्पांबाबत केंद्रीय रेल्वे, माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी यावेळी चर्चा करणार आहेत. तसेच राज्यातील समृद्धी महामार्ग व इतर महामार्गांच्या कामांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
काही खासदार, आमदारांचीही हजेरीकाही खासदार व आमदारही दिल्लीत शिंदे गटाचे काही खासदार व आमदारही दिल्लीत हजेरी लावणार आहेत. हे आमदार व खासदार खरी शिवसेना असल्याचे आणखी काही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याचे समजते. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाकडे राहील, हे प्रकरण निवडणूक आयोगापुढे आहे.