Eknath Shinde ( Marathi News ) : मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. राजकीय वर्तुळातून त्यांना सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह देशात दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देत आभार मानले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेल्या ६ सहा महिन्यांपूर्वी अजित पवार सामील झाले. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री हे पद मिळाले. त्यावेळी अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळणार अशी जोरदार चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रामध्ये विकास, बदल घडवून आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आणि विश्वास मोलाचा असतो. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना अनेकांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव मिळत आहेत. आज वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छा ही सर्वांत मोठी भेट आहे. तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो", असंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे.
दरम्यान, काल रात्री शिवसेना उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आणि मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल रात्री ठाण्यातील त्यांच्या खासगी निवासस्थानी लावलेले लाईट्स, बॅनर काढण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'महाराष्ट्राचे गतिमान आणि मेहनती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तळागाळातील सहभाग आणि मेहनती स्वभावामुळे त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. राज्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना.