लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे विस्तार आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिंदे आता दिल्लीत परत कधी जाणार, हेही निश्चित नाही.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि काही बैठकांनंतर शिंदे दिल्लीला रवाना होणार होते. आज दिल्लीत त्यांचा मुक्काम होता. ते कोणाला भेटणार, याबाबत त्यांच्या कार्यालयाने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत काही ज्येष्ठ वकिलांशी ते चर्चा करणार होते आणि भाजपच्या श्रेष्ठींनादेखील विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी भेटणार होते, अशी माहिती आहे. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गुरुवारी दिल्लीला जात आहेत. ते २९ जुलै रोजी मुंबईत परततील. त्यामुळे दोन दिवस तरी विस्तार होणार नाही, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आतापर्यंत चारवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत.
मंत्रिमंडळाची चौथी बैठकही दोघांचीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाची बुधवारची बैठकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच उपस्थितीत झाली. नवीन सरकार आल्यानंतरची ही चौथी बैठक होती. पहिली बैठक शपथविधीच्या दिवशी म्हणजे ३० जूनला झाली होती. त्यानंतर १४ आणि १६ जुलैरोजी मंत्रिमंडळ बैठक झाली होती.