मुंबई : राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी बहुमत मिळाले. तरीसुद्धा सत्तेच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिवसेनेनं सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली होती. परंतु भाजपानं ती धुडकावून लावत त्यांना काही मंत्रिपद वाढवून देण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपा मुख्यमंत्रिपदच शिवसेनेला देत असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी विधान केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु त्यासंदर्भातही मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:ला एक शिवसैनिक मानतात म्हणून असं म्हटल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच मुख्यमंत्रिपद सोडून बाकी सर्व पदांसंदर्भात चर्चेतून मार्ग काढू, असं विधान भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक यश न मिळाल्याने शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. मात्र आधी फार्म्युला नंतर सत्तास्थापना अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. अन्यथा दुसरा पर्याय असल्याचा सूचक इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरकार स्थापनेवरून आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणाऱ्या शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांनी आज काहीसा नरमाईचा पवित्रा घेतल्याचे दिसून आले. युतीमध्ये राहण्यातच शिवसेना आणि भाजपाचं तसंच राज्याचं भलं आहे, असे राऊत यांनी सांगिलते. भाजपाने मंत्रिमंडळातील खात्यांच्या दिलेल्या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता राऊत म्हणाले की, ''आम्ही येथे खाती वही घेऊन बसलेलो नाही. काही बातम्या पसरवल्या जात आहेत. प्रसारमाध्यमेही बातम्या पसरवत आहेत, याला पुड्या सोडणे म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला.