मुंबई : मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री असून पुन्हा मीच येणार आहे, असे सांगत कोणी काही बोलले, म्हणून मुख्यमंत्रीपद ठरत नसते. जनताच मुख्यमंत्री ठरविते. काही लोकांना बोलायची खुमखुमी असते. आपल्या मित्रपक्षाकडे खुमखुमी असणारे थोडे जास्तच आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील काही बोलघेवड्या नेत्यांना ठणकावले.
गोरेगाव येथे रविवारी भाजपच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक झाली. बैठकीचा समारोप फडणवीस यांच्या भाषणाने झाला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सचिव व्ही. सतिश, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात समसमान जागावाटपाची चर्चा झाली. मुख्यमंत्री पदाची कारकिर्दही वाटून घेतली जाणार, हे मी स्वत: ऐकले आहे. मुख्यमंत्री फडणवीसही त्यावेळी उपस्थित होते, असे विधान युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नुकतेच केले आहे. शिवाय, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही याचीच री ओढत मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे.
या संदर्भात फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक युती म्हणूनच लढली जाणार आहे. याबाबत कोणताही संभ्रम बाळगू नका. २२० जागा जिंकणे हे महायुतीचे लक्ष्य आहे. कोणाला किती जागा मिळणार, याचाही निर्णय लवकरच होईल. मात्र, मुख्यमंत्रीपद वगैरे चर्चेत पडू नका. कोणी काही बोलले म्हणून मुख्यमंत्रीपद ठरत नसते. काही लोकांना बोलायची खुमखुमीच असते आणि आपल्या मित्रपक्षाकडे खुमखुमी असणारे थोडे जास्तच आहेत. आपल्याकडेही काही आहेत. याबाबत बोलायची आवश्यकता नाही. पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार, हे यापूर्वीच मी सांगितलं आहे. त्यामुळे कोण, कधी, कसा? अशा चिंता करत बसू नका, सगळे व्यवस्थित होणार, असा विश्वासही फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरुच राहाणार!अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांची बडदास्त ठेवली जात आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये याबाबत दबक्या आवाजात नाराजी व्यक्त होत आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्यवेळी संधी मिळेल असे आश्वस्त करतानाच ‘इमकमिंग’ थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजप ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. ही पब्लिक अनलिमिटेड कंपनी आहे. येणाºयांचे स्वागतच आहे. मात्र, त्यांना तपासून घेऊ. त्यासाठी त्रागा करण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तिकीटवाटप परस्पर करू नका!उमेदवारी देण्याचे आपले निकष ठरलेले आहे. संघटना, लोक काय म्हणतात, सर्वेक्षण या आधारावर तिकिटाचा निर्णय होईल. परस्पर तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरू करू नका. आगे बढो, जिंदाबाद- मुर्दाबाद असला शहाणपणा करू नका, उचकेगिरी करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले.
गडकरी, मुंडे यांच्या गैरहजेरीची चर्चाभाजप कार्यकारिणीच्या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे गैरहजर होते, तर वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार उशिरा पोहोचले. यावरून उलट-सुलट चर्चा होताच, चंद्रकांत पाटील यांना खुलासा करावा लागला. ते म्हणाले, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे गडकरी उपस्थित राहू शकले नाहीत, तर पंकजा मुंडे अमेरिकेत आहेत. आजारी असल्याने मुनगंटीवारांना विलंब झाला.