मुंबई - शहरातील प्रसिद्ध ड्रग माफिया बेबी पाटणकर प्रकरणातून दोषमुक्त झालेले माजी पोलीस अधिकारी सुहास गोखले यांचा मुलगा साकेत गोखले याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र लिहिलं आहे. अमली पदार्थ विरोधी शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुहास गोखले यांचा बेबी पाटणकरशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या रिपोर्टमधून सुहास गोखले यांना क्लीनचीट देण्यात आली आहे.
सुहास गोखले यांच्यासोबत गौतम गायकवाड, सुधाकर सारंग, ज्योतिराम माने आणि यशवंत पराटे यांच्यावरही आरोप झाले होते. मात्र या सगळ्यांना या आरोपातून दोषमुक्त करण्यात आलं आहे. साकेत गोखले यांनी ट्विटरवर या प्रकरणावर भाष्य करत निर्दोष सुटलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची सरकारने माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वडिलांची माफी अथवा दिलगीरी व्यक्त करतील अशी अपेक्षा ठेऊ शकतो का? असं त्याने म्हटलं आहे.
2015 मध्ये सुहास गोखले यांच्यावर आणि त्यांच्या सहकारी पोलिसांवर बेबी पाटणकरशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. बेबी पाटणकरशी आर्थिक व्यवहार करुन त्याला पळून जाण्यास मदत केली असल्याचा आरोप होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाने पोलिसांना क्लीनचीट दिली आहे.
याआधी सुहास गोखले यांनीही सांगितले की, मी पोलीस आहे मात्र पोलिसांनीच माझं आयुष्य बरबाद केलं. न्यायासाठी त्यांना चार वर्षे लढाई लढावी लागली. 1 ऑगस्टपासून सुहास गोखले उपोषण करणार होते. याबाबत त्यांनी 14 जुलैला मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळविलं होतं. सुहास गोखले यांना 29 मे 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. 31 मे रोजी गोखले निवृत्त होणार होते. मात्र एका षडयंत्राखाली त्यांना फसविण्यात आले. कारण ड्रग्सविरोधी कायदा आणला गेला त्यात माझाही सहभाग होता.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तुमच्याकडून माझ्या वडिलांना सहानुभूती मिळणार का? सुहास गोखले यांच्याविरोधात खोटे आरोप केले जात असतानाही गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. सुहास गोखलेंची निर्दोष सुटका झाल्यानंतर गेल्या चार वर्षात त्यांनी गमावलेला मान- सन्मान परत मिळणार का, असा प्रश्नही साकेत गोखलेकडून उपस्थित करण्यात आला आहे.