मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:21+5:302021-03-21T04:07:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव ...

The Chief Minister should conduct an impartial inquiry into the allegations made by Parambir Singh | मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी

मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना देशमुख यांनी सिंग खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. तसेच, सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

१८ मार्च रोजी ‘लोकमत’च्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने १९ मार्च रोजी पुन्हा व्हॉट्सॲपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉट्सॲप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना सिंग किती अधीर झाले होते हे लक्षात येते. सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय, अशी विचारणा देशमुख यांनी केली आहे.

पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करीत आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंग यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही? एवढे दिवस शांत का होते? विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणांचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Web Title: The Chief Minister should conduct an impartial inquiry into the allegations made by Parambir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.