मुंबई : राज्यातील विरोधी पक्ष, आंदोलक शेतकरी आणि माध्यमांबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेली भाषा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभणारी नाही. सत्तेच्या भाराखाली फडणवीसांची शालीनता गहाळ झाली आहे, असा टोला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ता सचिन सावंत यांनी लगावला. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी सुकाणू समिती आणि आंदोलक शेतकºयांना देशद्रोही ठरविले, प्रसारमाध्यमांवर टीका केली. तर राजकीय विरोधकांची ‘दलाल’ या शब्दांत संभावना केली. राज्यात आणि सत्तेत आमचे सरकार आहे. विरोधकांना निवडून दिले, तरी त्यांना कामासाठी माझ्याकडेच हात पसरावे लागणार असल्याने, हे दलाल हवेत कशाला, ही मुख्यमंत्र्यांची भाषा देशाच्या संसदीय लोकशाहीला शोभणारी नाही. सरकारची अकार्यक्षमता उघडी पडल्यानेच मुख्यमंत्र्यांचा त्रागा सुरू आहे आणि त्यांचा तोल ढासळत असल्याचेही सावंत म्हणाले.शेतकरी, राजकीय विरोधक आणि पत्रकारांबद्दल अपशब्द वापरणारे फडणवीस सरकार, जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. अडीच वर्षांत दहा हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केली. गेल्या सात दिवसांत ३४ शेतकºयांनी आपली जीवन यात्रा संपविली. असे असतानाही सरकार मात्र, केवळ खोटी घोषणाबाजी, खोटी आकडेवारी देण्यातच व्यस्त आहे. ११ जूनला सरकारने शेतकºयांना दहा हजार रुपयांची उचल देण्याची घोषणा केली. या घोषणेला आता दोन महिन्यांहून अधिका काळ उलटला आहे. राज्यात एक कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी असताना, आतापर्यंत फक्त २४ हजार १३१ शेतकºयांनाच ही रक्कम मिळाली आहे. या योजनेत फक्त २४ कोटी रुपयांचेच वाटप झाले आहे. अनेक भागांत पाऊस नसल्याने दुष्काळसदश्य स्थिती निर्माण झाली असतानाही, कोणतीही सरकारी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही, असा आरोप सावंत यांनी केला.>मुख्यमंत्र्यांची भाषा देशाच्या संसदीय लोकशाहीला शोभणारी नाही. शालीनता आणि विनम्रता हा राजकीय नेतृत्वाचा गुणच आपल्यातून हरपल्याचे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केल्याची टीका सावंत यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी शालीनता सांभाळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:55 AM