लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहीहंडी मंडळे, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. मात्र, हा निर्णय आम्हाला मान्य नसून, मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा, अशी मागणी गोविंदांनी केली आहे.
जय जवान गोविंदा पथकाचे विजय निकम म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मुंबईत शंभर ते दीडशे गोविंदा पथके आहेत. त्यांना प्रथेप्रमाणे आपला सण साजरा करू देण्यास विरोध का? कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तरी दहीहंडी साजरी करण्यास मनाई करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षी कोरोनाचा जोर अधिक असल्याने सर्व सण-समारंभ रद्द करण्यात आले. यंदा स्थिती बदलली आहे. लोकांना स्वसुरक्षेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे केवळ गोविंदा पथकांच्या उपस्थितीत दहीहंडीला परवानगी देण्यास काहीही हरकत नाही. प्रत्येक मंडळाकडून नियमपालनाची हमी घ्यावी. नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. या उत्सवावर पूर्णपणे बंदी घालणे उचित राहणार नाही, असे मत कुर्ल्यातील गोविंदा पथकाचे गोविंदा गुणवंत दांगट यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करावा. इतर सणांना परवानगी देताना दहीहंडीबाबत आडमुठेपणा का, असा सवाल जोगेश्वरी येथील गोविंदा मनोज कांबळी यांनी उपस्थित केला. किमान लसीकरण पूर्ण झालेल्यांना तरी थर लावण्याची परवानगी द्यावी, राजकीय सभा, मेळावे, आंदोलनांना कोणतीही हरकत घेतली जात नाही; पण सण जवळ आले की नियमावली पुढे केली जाते. हा दुजाभाव असल्याचेही ते म्हणाले.
..................
निर्णयाचा निषेध
दहीहंडी साजरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो. त्यांनी यासंदर्भात फेरविचार करावा. लसीकरण पूर्ण झालेल्यांना दहीहंडीसाठी परवानगी द्यायला काय हरकत आहे? मुंबईतील शेकडो गोविंदा पथकांवर अन्याय आहे.
- विजय निकम, जय जवान गोविंदा पथक
.........
उत्सव साजरे झालेच पाहिजेत
संस्कृती टिकविण्यासाठी उत्सव साजरे झालेच पाहिजेत. लसीकरण पूर्ण झालेल्यांना दहीकाला साजरा करण्यास सरकारने परवानगी द्यावी. महाराष्ट्रात जेवढे सण साजरे होतात, त्यांची यादी तयार करून संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. स्थगिती देऊन तोडगा निघणार नाही, ठोस उपाययोजना कराव्यात.
- प्रशांत पळ, राष्ट्राभिमानी सेवा समिती बालगोविंदा पथक, माहीम