मुंबई-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझं आव्हान आहे. त्यांनी एकाच व्यासपीठावर यावं आणि माझ्याशी 'वन ऑन वन' बोलावं, असं खुलं आव्हान आज आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. तसंच राज्यात महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणुकीसाठी वातावरण बरोबर नव्हतं असं टाटाच्या कोणत्या अधिकाऱ्यानं म्हटलं त्याचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“महाराष्ट्रात येणारा गुंतवणुकीचा बाप कुणी रोखला”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन सरकारवर केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यात फडणवीस यांनी महाराष्ट्राबाहेर गेलेले प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्याच काळात बाहेर गेले होते याचे पुरावे सादर केले. फडणवीसांनी केलेले सर्व आरोप आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले.
देवेंद्र फडणवीस आरोप करत असलेला फॉक्सकॉन प्रकल्प वेगळाच आहे. वेदांता-फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत. त्यामुळे आकडे सांगून जनतेची दिशाभूल केली जाऊ नये, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच जर संबंधित प्रकल्प महाविकास आघाडीच्याच काळात गेले होते. मग तुम्ही संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना कशासाठी भेटलात?, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट दाखवलं.
"फडणवीस सांगत असलेला प्रकल्प दुसराच आहे. मे २०२२ मध्ये फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांनी तळेगावात भेट दिली होती. जागेची पाहणी केली होती. जर आमच्याच काळात फॉक्सकॉनवाल्यांनी तिथं जायचं ठरवलं होतं. मग हे लोक त्यांना भेटलेच कशाला? त्यांच्यासोबत चहापानाचे फोटो ट्विटवर आहेत. आता चहा-बिस्कीट बाहेर मिळत नव्हतं म्हणून तुम्ही त्यांना भेटलात का? किंवा मग जसे तुम्ही आमचे आमदार पळवले तसं तो प्रकल्प गुजरातमधून पळवून आणणार होतात का?", असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी 'वन ऑन वन' बोलावं"वेदांता महाराष्ट्राय येतोय असं भर विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे बोलले होते. मग त्यांनी विधानसभेत चुकीची माहिती दिली का? मी ओपन चॅलेंज करतो. मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी 'वन ऑन वन' बोलावं. आज फक्त उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले आहेत हेच अंतिम सत्य आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
फडणवीसांनी त्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करावंउपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत टाटा एअरबस प्रकल्पाबाबत माहिती देताना टाटाच्या अधिकाऱ्यानं राज्यात गुंतवणुकीस योग्य वातावरण नसल्याचं आपल्यासमोर म्हटलं होतं असा दावा केला. त्यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांनी संबंधित अधिकाऱ्यानं नाव जाहीर करावं असं आव्हान दिलं आहे. "मी चॅलेंज करतो. उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जो कुणी अधिकारी उद्योगासाठी वातावरण चांगलं नव्हतं असं त्यांना म्हटलं त्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करावं. मी तुम्हाला सांगतो की आमची जेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत भेट झाली होती. तेव्हा त्यांनी सकारात्मकच प्रतिसाद दिला होता. पण त्यांनी सांगितलं होतं की केंद्र सरकार आम्हाला सांगेल तिथं आम्हाला जावं लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांनी आज केवळ आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न केला आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"