Join us

वाढवणप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:08 AM

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला ...

हितेन नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर : बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदराला स्थानिकांचा असलेला विरोध पाहता आपल्या भूमिकेवर ठाम राहावे. त्यासाठी लवकरच आपण त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले.

केंद्राने वाढवण बंदराची घोषणा केल्यानंतर स्थानिकांचा विरोध वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आल्यानंतर पूर्वीही मी आपल्यासोबत होतो, आताही मी तुमच्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी संघर्ष समितीला दिली होती. त्यानंतर आजपर्यंत अनेक संघटनांनी, स्थानिक आमदार, खासदारांनी वाढवण बंदराला आपला विरोध असल्याचे पत्र बंदरविरोधी समितीला दिले आहे. असे असले तरी वाढवणमध्ये सर्वेक्षणाच्या हालचालीदरम्यान स्थानिकांनी उभ्या केलेल्या आंदोलनात अनेक लोकप्रतिनिधींच्या असलेल्या गैरहजेरीमुळे स्थानिकांच्या मनात संशयाचे ढग जमू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर झाई ते कुलाबादरम्यानच्या किनारपट्टीवरील स्थानिकांनी उभारलेल्या अभूतपूर्व एकजुटीची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेत संघर्ष समिती, मच्छीमार संघटनांना भेटीला बोलावले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे डहाणूमध्ये एका खाजगी कार्यक्रमाला येऊन गेल्यानंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगल्याच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध पाहता आघाडी सरकारने स्थानिकांसोबत राहावे, यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ आदी संघटनांनी शुक्रवारी यशवंतराव प्रतिष्ठान सेंटर, मुंबई येथे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.

या वेळी बाळासाहेबांनी बंदराला स्थानिकांचा कडवा विरोध पाहता त्यांच्यासोबत राहत बंदर होऊ दिले नव्हते. आजही स्थानिकांचा विरोध वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या सोबत राहावे, यासाठी आपण त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तर, खा. सुळे यांनी आपण केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी चर्चा करून लोकांचा कडवा विरोध पाहता स्थानिक खासदार राजेंद्र गावित यांच्यासोबत हे बंदर रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया :

वाढवण बंदरास स्थानिकांचा व मच्छीमारांचा वाढता विरोध पाहता शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात स्थानिकांसोबत राहावे.

- अनिकेत पाटील, कार्याध्यक्ष, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती

फोटो : खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंब्याचे निवेदन देताना वाढवणविरोधी संघर्ष समिती आणि मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी.