कर्नाटकातील लढाई नरेंद्र मोदींविरुद्ध मुख्यमंत्री सिद्धरामय्या - संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:37 AM2018-04-07T04:37:56+5:302018-04-07T04:37:56+5:30
कर्नाटकातील निवडणूक मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी असून या राज्यात भाजपा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मुंबई - कर्नाटकातील निवडणूक मुख्यमंत्री सिद्धरामय्या विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी अशी असून या राज्यात भाजपा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता दिसत नाही, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
खा. राऊत म्हणाले, गुजरातमध्ये मोदीविरुद्ध राहुल गांधी असा सामना होता. त्यात मोदींनी बाजी मारली असली तरी ते काठावर पास झाले.
राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असून २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे नेतृत्व अधिक बहरेल. कर्नाटकात राहुल यांच्याऐवजी सिद्धरामय्या हेच भाजपाला पुरुन उरतील. भाजपामध्ये प्रचंड अतंर्गत लाथाळ्या असून अनेकांचा बी. एस. येडियुरप्पा यांना विरोध आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची शिफारस करून कॉंग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेना कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २५ जागा लढविणार आहे. मात्र सीमावर्ती भागात आमचा महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा असेल. शरद पवारांनी देखील या
समितीला पाठिंबा देऊन मराठी भाषिकांना बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.