मुंबईतील विकासकामांची मुख्यमंत्र्यांनी घेतली झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:08 AM2021-01-20T04:08:22+5:302021-01-20T04:08:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एकीकडे भाजप पक्ष आक्रमक झाला असताना काँग्रेसनेही आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकीकडे भाजप पक्ष आक्रमक झाला असताना काँग्रेसनेही आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील विकासकामांची झाडाझडती घेण्यास खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई तसेच पादचारी मार्ग, उड्डाणपुलांची कामं, शौचालयांची संख्या वाढविणे आदी विकासकामे जून अखेरीपर्यंत पूर्ण करण्याची मुदत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिली आहे.
सन २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. भाजप पक्षाबरोबर फारकत घेतल्यानंतर शिवसेनेचे ही दुसरी निवडणूक आहे, तर राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या काँग्रेसने स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. मात्र २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका तर २०२० मध्ये कोरोनाचे संकट यामुळे विकासकामे थंडावली होती. यामुळे वर्षभरात महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात येऊन विकासकामांचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारासू उपस्थित होते. यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले.
- पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश
* मुंबईतील १४९ पादचारी मार्गांचे सौंदर्यीकरण मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
* ३४४ उड्डणपुलापैकी ४२ पुलांची काम, १२० वाहतूक बेटांचे सुशोभिकरण, स्ट्रीट फुड हबसाठी ६२ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे.
* नव्याने २२ हजार ७७४ शौचकुप बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी २० हजार ३०१ शौचकुपांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्याचबरोबर ८६३७ नवीन प्रसाधनगृह बांधण्यात येणार आहेत.
* पाणी तुंबणाऱ्या २९१ ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच मंडया, उद्याने, रस्ते यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.